
Convener's Message
पृथ्वीतलावरच्या समस्त मराठी मंडळींना,
सप्रेम नमस्कार. खरंच, हा संदेश तुम्ही संगणकाच्या सहाय्याने जगात कुठूनही वाचू शकता. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १५व्या अधिवेशनाच्या वेब साईट वर (जागतिक महाजालावरील संकेत स्थळ! हुश्श, एकदा म्हणून टाकलं, पुन्हा म्हणणार नाही) महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या वतीने तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. शिकागो मध्ये १९८१ साली तीन द्रष्ट्या व्यक्तींनी (कै. विष्णू वैद्य, कै. शरद गोडबोले, सौ. जयश्री हुपरीकर) बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. उत्तर अमेरिकेतल्या मराठी समाजाला संघटित करून मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता सातासमुद्रापार जतन आणि वृद्धिंगत करण्याचा उदात्त हेतू मंडळाच्या जन्माशी निगडीत आहे. मराठी माणसं जगात कुठेही एकमेकांना भेटली तर पहिल्याच भेटीत "तुम्ही मूळचे कुठले?" हा प्रश्न हमखास विचारला जातो. आपल्या मूळ गावाबद्दल प्रत्येकाला एक खास आस्था, आपुलकी वाटते यात संशय नाही. तर मंडळी, १९८४ च्या पहिल्या अधिवेशनानंतर पुन्हा एकदा २७ वर्षांनी अधिवेशन मंडळाच्या जन्मस्थळी परतणार आहे, जुलै, २१-२४, २०११ रोजी. बृहन्महाराष्ट्र मंडळाशी निगडीत असलेल्या सर्वांसाठी ही घटना अतिशय अभिमानास्पद आहे.
स्वामी विवेकानंदांच्या पद्स्पर्शानी आणि त्यांच्या अमोघ वाणीनी पावन झालेल्या या भूमीत तुमचं सगळ्यांचं आदरातिथ्य करायला शिकागोमधले सर्व मराठीबांधव अतिशय उत्सुक आहेत. अधिवेशनासाठी निवडलेले सुसज्ज सभागृह हे प्रमुख आकर्षण तर आहेच पण त्याचबरोबर सर्व वयाच्या आणि विविध आवडीच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे कार्यक्रम सादर करण्याचा आमचा मानस आहे.
या अधिवेशनाचा प्रमुख संयोजक या नात्याने मी आपल्या सर्वांना अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे मनःपूर्वक आमंत्रण आणि आवाहन करतो.
-आपला कृपाभिलाषी,
नितीन जोशी






